Saturday, October 4

नव्या निवड समितीत सुरेन्द्र भावे : एका गुणवान खेळाडूला उशीरा मिळालेला न्याय


गेल्या दशकात देशांतर्गत क्रिकेट मध्ये धावांचा पाऊस पाडणऱ्या महाराष्ट्राच्या सुरेन्द्र भावेचा नुकत्याच जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या निवडसमितीत समावेश झाल्याने आनंद वाटला. जवळजवळ आठ हजार धावा व अठ्ठावीस शतके ठोकूनही त्या वेळच्या निवडसमितीने त्याच्यावर फारच अन्याय केला होता. दुय्यम दर्जाच्या सार्क कप स्पर्धेत १९९२-९३ मध्ये भारतातर्फे केवळ दोन सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. तेव्हा निवडसमितीने डावलले तरी आता त्यालाच ’सिलेक्टर’पद मिळाले हा नियतीचा वेगळाच न्याय!
भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या मराठी क्रिकेटपटूंची संख्या मोठी आहे. पण त्यातील बहुसंख्य मुंबईकडून खेळणारे. महाराष्ट्र राज्यातील इतर दोन संघातील (महाराष्ट्र व नागपूर) खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर क्वचितच मिळाली. केवळ चंदू बोर्डे यांना भारतीय संघाचे कर्णधारपद, प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवडसमितीचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
अत्यंत प्रतिभावान असूनही दुर्लक्षित रहाण्याची वेळ अनेक महाराष्ट्रियन क्रिकटर्सवर आली आहे. ज्या काळात मध्यमगती गोलंदाजांची वानवा होती त्या काळात पांडुरंग साळगावकरला डावलण्यात आले. १९७५ च्या आसपास महाराष्ट्राचे हेमंत कानिटकरचेतन चौहान ऐन भरात होते. पण कनिटकरला केवळ दोन सामन्यांसाठी संधी मिळाली. तर चौहानची वर्णी लागली तो बेदीच्या दिल्ली संघात गेल्यावरच. सुरेन्द्र भावेसारखाच गेल्या पंचवीस वर्षात अनेक गुणी खेळाडूंवर अन्याय झाला. राजू भालेकर, शंतनू सुगवेकर, मिलिंद गुंजाळ, इक्बाल सिद्दिकी अभिजित काळे ही अशीच काही नावे. हृषिकेष कानिटकरला मात्र मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.
महाराष्ट्राच्या खेळाडूंची उपेक्षा बघून की काय, काही जणांनी दुसऱ्या संघांकडून खेळणे पसंत केले. जहीर खान (बडोदा) व संजय बांगर (रेल्वे) ही ठळक उदाहरणे. धीरज जाधवने तर वैतागाच्या भरात बंडखोरी करून आयसीएलचा रस्ता धरला. सुरेन्द्र भावेच्या निवडसमितीतील कारकीर्दीत महाराष्ट्राच्या प्रतिभेला न्याय मिळेल अशी आशा वाटते.

Wednesday, October 1

’सिलेक्टर’ श्रीकांतची सावध खेळी: भारतीय संघात सर्व जुनेच चेहरे!

कृष्णम्माचारी श्रीकांत त्याच्या धडाकेबाज व आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. पण निवड समितीच्या अध्यक्षाची त्याच्या कारकीर्दीची सुरुवात अतिशय सावधपणे झाली आहे. निवड समितीने कुठलाही धोका न पत्करता सर्व जुन्याजाणत्या खेळाडूंनाच ऑस्ट्रेलिया विरुध्द्च्या पहिल्या दोन सामन्यासाठी निवडले आहे.



सर्व ’सीनीयर्स’चे सामूहिक अपयश हेच श्रीलंकेविरुध्द्च्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीचे मुख्य कारण. इराणी ट्रॉफी संघातून गांगुलीला वगळून निवड समितीच्या मावळत्या अध्यक्षांनी नवीन संघबांधणीचे संकेत दिले होते. अशात गांगुलीला परत संघात घेऊन नव्या निवड समितीने माघार घेतली असेच म्हणायला हवे. उलट संघातील इतर प्रस्थापित (द्रविड, सचिन, लक्षमण, कुंबळे) यांनी जर क्रिकेट मंडळाने देऊ केलेली व्हीआरएस लवकर स्वीकारली नाही तर एकेकाला सक्तीने ’रिटायर’ करण्याच्या दिशेने आता विचार करायला हवा। फटकेबाज श्रीकांतची ही सावध सुरुवात थोडीशी अनपेक्षितच.


संबंधित लिंक्स:


Sunday, September 28

खेळाडूंची स्वेच्छानिवृत्ती

नुकत्याच झालेल्या इराणी ट्रॉफी सामन्यासाठी शेष भारत संघासातून सौरव गांगुलीला वगळण्यात आले। अन्य वरिष्ठ खेळाडूंसाठीही ही जणू पूर्वसूचनाच आहे. आपले प्रदर्शन दिवसेंदिवस खालावत असताना द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण, व कुंबळे यांनीही ’ड्रॉप’ होण्याची नामुष्की यायच्या आत स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणे योग्य नाही का?
आपला ऎन भराचा काळ आता संपला आहे हे सहजासहजी न मान्य करण्याची प्रवृती सिनेनटनट्या, राजकारणी यांच्याप्रमाणे भारतीय खेळाडूंमध्येही पहावयास मिळते। एक सुनील गावसकर सोडल्यास कुणालाही मोह आवरता आला नाही. फक्त क्रिकेटर्सच नव्हे, तर अन्य खेळाडूंमध्येही ही वृती दिसून येते. गेली सहा वर्षे उतरती कामगिरी दाखवणारी अंजू जॉर्ज, गेल्या तीन ऒलिम्पिक्समधून हात हलवीत येत असलेली अंजली भागवत, चाळीस वर्षाचा होऊनही संघात येण्यासाठी आसुसलेला धनराज पिल्ले यांच्या बाबतीत हेच म्हणावेसे वाटते.
एवढा ग्रेट कपिलदेव, पण सर्वाधिक बळींचा विक्रम गाठण्यासाठी शेवटची दोन वर्षे संघावर भारच होता. त्याच्या ग्रेटपणाच्या दडपणामुळे ते झाकून गेले. सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही तेच होत आहे. तेंडुलकरच्या फॉर्मबद्दल होणारी कुजबूज अजून मोठी होण्याच्या आत सचिन आणि कंपनीने स्वत:हून पड्द्याआड गेलेले बरे।
संबंधित लिंक्स :