Friday, September 19

टॉप टेन : मराठी मातीतून निर्माण झालेली ’खेल रत्ने’

देशाच्या सर्वांगीण प्रगतीत महाराष्ट्राने फार मोठा हातभार लावला आहे. इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडाक्षेत्रालाही महाराष्ट्राने देशाचे नाव गाजवणारे अनेक नायक दिले. क्रीडाक्षेत्रातील हे कांही निवडक मरठी मानबिंदू:
क्रिकेटमहर्षि दि.ब.देवधर : क्रिकेट आज देशातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. अनेक मरठी क्रिकेट सुपरस्टार्स महाराष्ट्रातून निर्माण झाले. पण देवधरांना आद्य क्रिकेट सुपरस्टार म्हटल्यास वावगे ठरू नये. पंचरंगी व रणजी स्पर्धांमधून देवधरानी नेत्रदीपक कामगिरी केली. भारतचे कसोटी सामन्यात पदार्पण त्यांच्यासाठी उशीरा झाले. पण इंग्लिश क्रिकेट मध्ये डब्ल्यू.जी. ग्रेस यांच्याप्रमाणेच देवधरांचे भारतीय क्रिकेट मध्ये मानाचे स्थान आहे।

खाशाबा जाधव : नुकत्याच संपलेल्या ऑलिम्पिक्सच्या निमित्ताने खाशाबा जाधवांचे नाव नवीन पिढीला माहीत झाले. भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक मिळवण्याचे श्रेय त्यांना जाते. १९५२ च्या हेलिसिंकी ओलिम्पिक्समध्ये त्यांनी कुस्तीत ब्रॉंझपदक पटकावले होते. यंदाच्या तीन पदकविजेत्यांना भरपूर बक्षिसे व मानसन्मान मिळाले. पण खाशाबा जाधवांच्या वाटेला मात्र उपेक्षाच आली.
प्रवीण ठिपसे : भारतात व महाराष्ट्रातही बुध्दिबळ हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. १९८० पर्यंत मॅन्युएल ऍरॉन हा भारताचा एकमेव आंतरराष्ट्रीय मास्टर होता. प्रवीण ठिपसे हा ग्रॅंडमास्टर नॉर्म मिळवणारा पहिला भारतीय. त्याच्या पावलावर पाउल ठेवत दिव्येंदु बारुआ व विश्वनाथन आनंद यांनी ग्रॅंडमास्टर किताब मिळवला. आनंद आज विश्वविजेता आहे. भारताकडे बुध्दिबळातील सुपरपॉवर म्हणून पाहिले जाते. पण याची सुरुवात प्रवीण ठिपसे पासून झाली हे मराठी माणसासाठी निश्चितच अभिमानास्पद!
बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर व टेबल टेनिस मध्ये सुजय घोरपडे यांनीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन केले. भारतात हॉकीची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्रातही हॉकीचे फारसे चाहते नाहीत. तरीही महाराष्ट्राच्या तुषार खांडेकरने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून चांगली कामगिरी केली.
भारतीय शूटर्स सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहेत. राज्यवर्धन राठोड, अभिनव बिन्द्रा इ. या नव्या पिढीच्या आधी नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्याच अशोक पंडितने अनेक वर्षे केले. इतर स्पर्धांमधून चमकणाऱ्या महाराष्ट्राच्या अंजली भागवत, दीपाली देशपांडे, सीमा शिरुर या महिला नेमबाज ऑलिम्पिक्समध्ये मात्र सातत्याने अयशस्वी होत आहेत.
भारतीय क्रिकेटला अनेक मराठी रत्ने लाभली. मुंबईस तर क्रिकेटचे माहेरघर म्हटले जाते. या मोठ्या यादीतील दोन नावांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पुरा होऊच शकत नाही. सुनील गावसकरसचिन तेंडुलकर. दोघेही आपापल्या कालखंडातील जगात सर्वोत्कृष्ट मानल्या गेले आहेतच. स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवाच्या जवळपास गावसकरांची कारकीर्द तर सुवर्णमहोत्सवाच्या वेळेस सचिन टॉप फॉर्मात. गावसकर खंबीर तर सचिन आक्रमक. आपपल्या काळातील भारतीय समाजाचे प्रतिबिम्ब दोघांच्याही शैलीत दिसते.
तर हा मराठी ’खेल रत्नाचा’ थोडक्यात आढावा. मराठी समाजाने खेळ संस्कृतीची जोपासना करत राहिल्यास भविष्यातही अशी अनेक रत्ने या मातीतून जन्माला येतील हे नक्की!

1 comments:

Anonymous said...

Till the seventies and eighties, Maharsahtra and particularly bombay (Mumbai) produced top class cricketers. But in last decade or so, barring Tendulkar no world class cricketer has emerged from Marathi background